Varandha Ghat Accident :
पुण्याहून वरंधा घाट मार्गे कोकणात पर्यटनासाठी जाणारी कार (MH 12 HD 3984) वरवंड गावच्या परिसरात वळणावर आल्यानंतर समोरून आलेल्या चारचाकीला साईड देण्याच्या प्रयत्नात कारचालक अक्षय धाडे चा कारवरील ताबा सुटला आणि कार नीरा देवघर धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कोसळली. यात एका तरुणीसह तिघांचा जागीच मृत्यू झाला, आणि संकेत चालत डोंगरातून रस्त्यावर आल्यामुळे अपघाताची माहिती मिळाली. या घाटात प्रवासासाठी बंदी असतानाही प्रवास करणं तिघांच्या जीवावर बेतलं आहे.
पुणे-कोकण मार्गावरील वरंधा घाटात निरा देवघर धरणात भीषण अपघात झाला असून नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ही कार कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या कारमधून चार जण प्रवास करत होते. त्यापैकी एक जण वाचला आहे. तीन जण धरणाच्या पाण्यात बेपत्ता झाले आहेत. दिवसभराच्या शोधानंतर दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले असून एकजण अजूनही बेपत्ता आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास झाली.
अपघातग्रस्तांची नावे -
अक्षय रमेश धाडे (वय 27, रा. ॲक्वामीस्ट सोसायटी शिंदेवस्ती रावेत), हर्षप्रित हरप्रीतसिंग बाबा (वय 30, रा. पाषाण, पुणे, मूळ जबलपूर, मध्यप्रदेश) व बेपत्ता व्यक्तीचे नाव स्वप्निल परशुराम शिंदे वय 28 ( रा. तुकाईनगर, हडपसर), संकेत जोशी वय 26 रा. बाणेर असे सुदैवाने बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. हे चौघेही मित्र असून शनिवार व रविवार सुट्टी असल्याने फिरण्यासाठी गेले होते.
गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मूसळधार पाऊस पडत असून जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू असल्याने सुरक्षेसाठी पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाटात सध्या वाहतूक बंद करण्यात आली आहे.
मात्र घाट बंद असताना काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाला न पाळता वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहेत. यातूनच अपघाताच्या घटना घडत आहेत.
अपघाताची माहिती शिरगाव येथील निलेश पोळ यांनी शासकीय यंत्रणा ना दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी रेखा वाणी, राजेंद्र कचरे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर पोलिस दत्तात्रय खेंगरे, उद्धव गायकवाड, तलाठी विकास कराळे, शिरगाव पोलिस पाटील सुधीर दिघे, सह्याद्री रेस्कु फोर्स तसेच हिर्डोशी, शिरगाव, वरवांड ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.
0 टिप्पण्या